जळगाव (प्रतिनिधी)- मराठी भाषा बोलतांना आपण अनेकदा इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मराठी भाषेतुन उत्तम संभाषण करण्यासाठी वाचन आणि शब्द संग्रह वाढविणे आवश्यक असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राठी उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राठी यांनी लोक साहित्य उत्सव मराठीचा या संकल्पनेनुसार मराठी शब्दांचा जास्तीत जास्त वापर करा. जेवढे मराठी शब्द तुम्हाला येतील तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. एळाद्या शब्दाचे समानार्थी शब्द शोधुन काढा, जेणेकरून शब्द संग्रह वाढेल असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस.एम. पाटील यांनी मराठी भाषा वापरतांना बारकावे लक्षात आले पाहिजे. त्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. रोज किमान दहा मिनीटे तरी मराठी भाषेतील वृत्तपत्र, मासिके, गोष्टीची पुस्तके वाचत रहा. त्यामुळे मराठी भाषेचा वापर करणे सहज शक्य होईल. वाचनाने भाषेचा सराव होतो तसा तो लिहीण्याने सुध्दा होत असल्याचे प्राचार्य एस.एम. पाटील यांनी सांगितले. सुत्रसंचालन व आभार भुषण वाघ यांनी मानले. यावेळी प्रा. मोनिका भावसार, प्रा. प्रवीण देवरे, प्रा. अनिल फापडे आदी उपस्थित होते.