धरणगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील धूपे खुर्द येथील मूळ रहिवासी ( ह.मु. जिजाऊ नगर, चोपडा) रवींद्र रतीलाल बोरसे (वय ५०) या प्राथमिक शिक्षकाचे २९ रोजी खर्दे, ता. धरणगाव येथे बीएलओचे काम करीत असताना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना खर्दे येथेच ऑन ड्युटी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
खर्दे, ता. धरणगाव येथील माजी पोलीस पाटील आत्माराम बाबुराव पाटील यांनी वाहनात टाकून येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
निवडणुकीबाबतचे मतदार नोंदणी आणि इतर कामे बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारणा केली होती. सुटी असताना ते खर्दे येथे कामानिमित्त गेले होते. काम सुरू असतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. रवींद्र बोरसे हे धुपे खुर्द येथील माजी पोलीस पाटील रतिलाल नथू बोरसे यांचे चिरंजीव आहेत. तर विद्यमान पोलीस पाटील मनीषा सूर्यकांत बोरसे यांचे जेठ आहेत.
बोरसे यांची अंत्ययात्रा ३० रोजी सकाळी दहा वाजता नवीन वसलेले गाव नवेधूपे येथून निघाली त्यांच्या पश्चात पत्नी मिनाबाई, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.