भुसावळ तालुक्यात तापी नदीपात्राजवळची घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – येथील तापी नदीच्या पात्रात गणेश विसर्जनासाठी आलेल्या एका दाम्पत्याच्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज गुरुवारी २८ रोजी दुपारी घडली. यात चालक थोडक्यात वाचला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात सकाळपासूनच गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. या अनुषंगाने जुना सातारा भागातील गोपाळ भंगाळे हे आपल्या कुटुंबासह भगवान परशुराम मंदिराचे बाजूने गणेश विसर्जनासाठी ओमनी कारमधून आले होते. त्यांनी नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या गॅसवर चालणार्या ओमनी कार सुरु करीत असताना कारमधील या कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर क्षणार्धात कारने पेट घेतला.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ लोकांनी धाव घेऊन आग विझवली. दरम्यान, या अपघातात गोपाळ भंगाळे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. भुसावळ पोलीस घटनेची माहिती घेत होते.