पारोळ्यातील नियोजित जागेचे पत्र महसूल विभागाकडून सुपूर्द
पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील शेळावे खुर्द गावासह परिसरातील ग्रामस्थांची विजेची समस्या लवकरच सुटणार असून, येथे वीज उपकेंद्रासाठी ४ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जळगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना या उपकेंद्राबाबत नियोजित जागेचे पत्र महसूल विभागाकडून सुपूर्द करण्यात आले.
शेळावे खुर्द येथील गट क्रमांक तीनचे एकूण क्षेत्र ६.२१ हेक्टर आर इतकी गावठाण जमिनीपैकी ०.६० आर जागा सरकार जमा करून महावितरणला ३० वर्षांच्या करारनाम्यावर नुकतीच सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे तब्बल ११ गावांना या उपकेंद्राचा फायदा होणार असून ही गावे उजेडात येणार आहेत. माजी सरपंच राजेंद्र पाटील व विद्यमान सरपंच रूपाली अमोल पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून शेळावे खुर्द परिसरात वीज उपकेंद्र व्हावे, यासाठी पाठपुरावा करत होते. वीज उपकेंद्र मंजूर झाल्याने परिसरातील अकरा गावांचा वीजप्रश्न सुटणार आहे. त्यात शेळावे खुर्द, शेळावे बुद्रुक, चिखलोड खुर्द, चिखलोड बुद्रुक, चिखलोड तांडा, मोहाडी, दहिगाव, धाबे, हिरापूर, राजवड व खेडी अशा अकरा गावांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
जळगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना या उपकेंद्राबाबत नियोजित जागेचे पत्र महसूल विभागाकडून सुपूर्द करण्यात आले. वेळी माजी सरपंच राजेंद्र पाटील, शेळावे विकास सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अकबर खाटीक, प्रकाश पाटील, जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष समाधान पाटील, शेळावे खुर्दचे युवा नेतृत्व अमोल पाटील, सरपंच रूपाली अमोल पाटील, पंचायत समिती माजी सभापती छाया पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक गिरधर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.