महिला मंडळ अधिकाऱ्यांवर वाळू व्यावसायिकांची गुंडगिरी, चौघे गजाआड

यावल तालुक्यात घडली होती घटना
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यात वढोदा परिसरात कर्तव्यावर असणार्या महिला मंडळ अधिकार्यांना धक्काबुक्की करून धमकावित गुंडगिरी करणार्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राहिला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बामणोद येथील मंडळ अधिकारी व थोरगव्हाणच्या पर्यवेक्षक म्हणुन कार्य सांभाळणार्या बबीता सुधाकर चौधरी या कर्तव्यावर असतांना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी वढोदे गावाजवळ विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आढळुन आले होते. मंडळ अधिकारी यांनी ट्रॅक्टरला थांबवुन वाळू वाहतुकीचा परवाना मागीतला होता. यावर उपस्थितांनी महीला अधिकार्यांशी हुज्जत घालुन त्यांना शिविगाळ करीत धक्काबुकी केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत यावल पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता .
दरम्यान, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी तपासचक्र वेगाने फिरून या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश समाधान सोनवणे ( वय२० वर्ष , रा. थोरगव्हाण), गोविंदा वना माळी (वय २४ वर्ष रा. साकळी ); मयुर प्रकाश कोळी, (वय २३ वर्ष रा. शिरसाड) आणी अजय दिलीप भालेराव (वय २३ वर्ष रा. थोरगव्हाण) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन पाच लाख रुपये किमतीच्या स्वराज्य कपनीच्या ट्रॅक्टरसह पोलीसांनी अटक केली आहे.









