भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कंडारी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात जबर हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये दोन सख्ख्या भावांचा खून झाला असून आणखी दोन जण जबर जखमी झाले आहेत. यातील काही संशयीतांची धरपकड करण्यात आल्याची माहिती मिळाली असून भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
विकास चंद्रकांत साळुंखे (वय २८, रा. महादेव टेकडी, कंडारी ता.भुसावळ) याने याबाबत फिर्याद दिली आहे. कंडारी गावामध्ये तो त्याचे चुलतभाऊ शांताराम व राकेश भोलानाथ साळुंखे या सख्या भावांसह राहतो. तिघे मिळून वीटभट्टीचा व्यवसाय करतात. लोखंडी रेल्वे पुलाजवळ त्यांची वीट भट्टी आहे. शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ शांताराम साळुंखे हा घरी आला आणि त्याने सांगितले की, मला गावांमध्ये संशयित दीपक छगन तायडे याने शिवीगाळ केली. त्यावरून फिर्यादी विकास साळुंखे, त्याचे दोन्ही चुलत भाऊ शांताराम व राकेश साळुंखे, त्यांचा शेजारी रमेश अशोक इंगळे असे दोन दुचाकींवर रात्री साडेदहा वाजता गावातील वखारीजवळ असलेल्या पानपट्टीवर गेले.
त्या ठिकाणी संशयित आरोपी दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवा भिल, किरण सपकाळे व त्याच्या सोबतचे चार इसम उभे होते. त्यावेळी दीपक तायडे याला फिर्यादी विकास साळुंखे यांनी, शांताराम भाऊला शिवीगाळ का केली ? असा जाब विचारला. त्याचे वाईट वाटून त्याने त्याच्या खिशातून चॉपर सारखे हत्यार काढून विकास याच्या डाव्या कानाखाली वार केला. तेव्हा दीपक तायडे सोबत असलेले इतर संशयित आरोपींनी लोखंडी पाईपने फिर्यादी व त्याच्यासोबतच्या व्यक्तींना मारहाण करू लागले. सर्व संशयित आरोपींनी फिर्यादी विकास साळुंखे, शांताराम साळुंखे, राकेश साळुंखे आणि रमेश इंगळे यांना लोखंडी पाइपाने तसेच लाथा बुक्क्यांनी व दगडांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीमध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी राकेश साळुंखे व शांताराम साळुंखे या दोघी सख्या भावांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. तसेच जखमी फिर्यादी विकास साळुंखे आणि रमेश इंगळे यांच्यावर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुसावळ शहर पोलीस स्टेशनला याबाबत विकास साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी परिविक्षाधीन डीवायएसपी सतीश कुलकर्णी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघम, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेतली. रात्रभरामध्ये संशयितांची धरपकड करण्यात येत होती. दरम्यान या घटनेमुळे भुसावळ तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.