“आम्हाला यायला-जायला बस मिळत नाही, आम्ही शिक्षण करायचे तरी कसे ?”
बांभोरी महामार्गावर संतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या बस, ठाकरे गटाने घेतली दखल
जळगाव (प्रतिनिधी) – “आम्हाला यायला-जायला बस मिळत नाही. एसटी बस थांब्यावर थांबत नाही. आम्ही शिक्षण करायचे तरी कसे ?” अशा शब्दात विद्यार्थ्यांनी सवाल करीत राष्ट्रीय महामार्गावर बस रोखून धरल्या. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे विद्यार्थ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. गावामधून दीडशे ते दोनशे मुलं शाळा शिकण्यासाठी धरणगाव येथे एसटी बसने प्रवास करत असतात. परंतु गेल्या तीन दिवसापासून १० वाजेपासून तर १ वाजेपर्यंत कुठलीही एसटी बस स्टॉपवर थांबायला तयार नाही. तसेच, धरणगाववरुन पाळधीला परतण्यासाठी दुपारी ते संध्याकाळी ६ दरम्यान तीन ते ४ बसफेऱ्या हव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यामुळे आज विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला व विद्यार्थ्यांनीच रस्त्यावर बसून एसटी बसला थांबून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. ताबडतोब एसटी महामंडळाच्या अधिकारी नीलिमा बागुल यांच्याशी संपर्क साधला. लवकरच ही समस्या दूर करू असा शब्द बागुल यांनी वाघ यांना दिला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लीलाधर पाटील, दिलीप पाटील, बापू गोविंदा पाटील, मगन शिवाजी माळी, नंदलाल रामदास पाटील, अंकुश पाटील, पुष्पराज पाटील, भूषण पाटील, महेंद्र पाटील, संतोष सोनवणे, गजू महाजन, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी, नंदू पाटील आदि उपस्थित होते.