शतकीय इतिहास असलेल्या बँकेचा ऐतिहासिक दिवस
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्वजारोहण यंदा एका जेष्ठ महिला सभासदाच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी चेअरमन पदावरील व्यक्ती ध्वजारोहण करीत असते. यंदा १०६ वर्षांची परंपरा मोडीत काढून तब्ब्ल ८० वर्षे सभासदाची परंपरा असलेल्या कुटुंबातील जेष्ठ महिला सभासद पुष्पाताई लीलाधर चौधरी यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.
एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे. चेअरमन संजय पवार, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सूचना केली. त्यानुसार जिल्हा बँकेचे सभासद चौधरी कुटुंबांची निवड करण्यात आली. एकेकाळी सांगवी ता. यावल येथील त्र्यंबक श्यामजी चौधरी हे जिल्हा बँकेचे ४५ वर्ष संचालक होते. त्यानंतर लीलाधर त्र्यंबक चौधरी हे जवळपास जिल्हा बँकेचे ३० वर्षे संचालक होते व त्यानंतर प्रशांत लीलाधर चौधरी हे देखील जिल्हा बँकेचे दहा वर्षे सभासद होते.
जवळपास एकाच कुटुंबात ८० वर्ष सभासद होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथील चौधरी कुटुंबाला मिळालेला आहे. त्यांच्याच परिवारातील महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी (वय वर्ष ८०) यांना झेंडावंदन करण्याचा मान जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आला. चेअरमन संजय पवार व कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या हस्ते पुष्पाताई चौधरी यांना शाल श्रीफळ व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. जळगाव जिल्हा बँकेच्या १०६ वर्षाच्या इतिहासात ज्येष्ठ सभासदाने झेंडावंदन करण्याचा मान मिळाल्याचे ही प्रथम घटना असल्याचे बोलले जात आहे.