बीड (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये भाजपमधील दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नावही या यादीमध्ये नाही. पक्षाकडून या दोघांनाही डावलण्यात आलं आहे. यामुळे पंकजा मुंडे समर्थ प्रचंड नाराज झाले आहेत. आता पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांनी भावनिक ट्वीट केलं आहे. ‘पण, वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंनी ट्विट करत म्हटलंय की, ‘आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीत सिंह मोहिते यांच्यासह डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके आणि गोपीचंद पडळकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या बंडखोरांना चाप लावल्याचं स्पष्ट झालं आहे.