सुरत येथून घेतले ताब्यात : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस सुरत येथे पळवून घेवून जाणार्या व त्यास मदत करणार्या अशा दोन जणांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले आहे .
याबाबत माहिती अशी कि , २४ जुलै रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान शिरसोली गावातील १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. मात्र तिचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने सेंट्रिंग व हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पित्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावरून भादंवी कलम ३६३ प्रमाणे दिनांक २५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक, अमोल मोरे, पोहेकॉ रतिलाल पवार हे करीत असतांना त्यांना आरोपी आणि पीडित मुलगी हे सुरत येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पथकातील पो. कॉ. अर्चना गायकवाड यांचे पथकाने सुरत येथे जावून सदर गुन्हयातील आरोपी विकास दौलत बारी व अल्पवयीन पिडीत ( वय १६ वर्ष ) यांचा शोध घेवून दिनांक ८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. पिडीत व आरोपी यांना विचारपुस केली असता त्यांना खोली भाडयाने घेवून देणारा व त्यांना मदत करणारा सागर अनिल बारी ( वय – २९) वर्ष रा.लक्ष्मणनगर, नवागाव दिडोली सुरत यास ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीचा जबाब नोंदविला असता अल्पवयीन पिडीत व आरोपी विकास दौलत बारी ( वय – २५ ) वर्ष यांना शिरसोली येथून पळवून जाण्यास त्याची मोटार सायकलवर बसवून पाचोरा येथे सोडणारा गणेश अशोक अस्वार ( वय – २२ वर्ष) रा.शिरसोली प्र.बो. ता.जि.जळगांव असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भादंवी कलम ३७६, २१२ सह पोक्सो कायदा कलम ४ व १७ वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर आरोपीस देखील गुन्हयात सहाय्यक केल्याने त्याची मोटार सायकल जप्त करण्यात आली व त्याला सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
हल्ली अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर अशा पिडीतेस पळवून नेण्यासाठी आरोपींना अनेक मुलांनी सहाय्य केल्याचे समोर येत आहे. अशा गुन्हयात मदत करणे व आश्रय देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. याची नागरीकांना माहीती व्हावी व यापुढे कोणी अशा गुन्हयात मदत करु नये, असे आवाहन एमआयडीसी पोलीसांकडून करण्यात आले आहे.