नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतातले अनेक सण समारंभ हे लंडनमध्ये देखील साजरे होत असतात. ६ ऑगस्टला लंडनमध्ये भारतात साजरा केला जाणारा ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने साडी वॉकेथॉनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तब्बल ६०० भारतीय महिलांनी सहभाग घेतला. भारतीय संस्कृतीप्रमाणे साजशृंगार करत या महिला लंडनच्या रस्त्यांवर उतरल्या.
बंगालमधील कोलकत्ता टाऊनहॉल येथे ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली. तेव्हापासून ७ ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ म्हणून साजरा होतो. या निमित्ताने लंडनमध्ये ६ ऑगस्ट रोजी साडी वॉकेथॉनच्या कार्यक्रमाचे आयोजन ‘ब्रिटिश वूमन इन सारी’च्या डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली झाले. सातासमुद्रापार वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये भारतीय हातमाग व हस्तकौशल्यातून तयार झालेल्या दागिन्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला. भारताच्या २८ राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून लंडन येथील ऐतिहासिक ट्रॅफल्गार स्क्वेअर येथे जमल्या. तेथे दुपारी एक वाजता ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात या वॉकेथॉनचा प्रारंभ झाला.
हा वॉकेथॉन ट्रॅफल्गार स्क्वेअरपासून ब्रिटनच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या १० डाउनिंग स्ट्रीट येथे पोहोचला. त्या ठिकाणी सहभागी महिलांनी भारतातील विविधतेतून एकात्मतेचे प्रदर्शन करत ‘काश्मीर तू, मैं कन्याकुमारी’, ऑस्कर पुरस्कृत ‘नाटु नाटु’ व ‘टम टम’, उत्तरेकडील राज्यांनी ‘भूमरो भूमरो’, पश्चिमेकडील राज्यांनी ‘घुमर’ तसेच पूर्वेकडील राज्यांनी ‘फागूणेर मोहानी’ अशा विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यानंतर वॉकेथॉनमधील महिलांनी लंडनच्या वेस्टमिन्स्टरमधील ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरवर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रगीत सादर करून त्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी ब्रिटनमधील ‘इंडियन हाय कमिशन’मधील काही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
लंडनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या प्रचंड आहे. पुण्यातील अनुजा हुडके जाधव, सोनिया गोखले व मुंबईतील रमा कर्मोकर, किरण चितळे यांनी या वॉकेथॉनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातील ५० महिलांनी या वॉकेथॉनमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमामधून जमा झालेला निधी भारतातील विणकरांसाठी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.