चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायत मध्ये २२ लाखांचा अपहार केल्याची फिर्याद दिल्यावरून तीन जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील करंजगाव येथील सेवानिवृत्त रहिवासी गोपीचंद काशिनाथ सानप ( वय – ६२ ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राजेंद्र केशव पाटील ( वय – ५८ ) सेवानिवृत्त ग्रामसेवक राहणार पाटोदा तालुका अमळनेर, माजी सरपंच आणि उपसरपंच नारायण झिपरू पाटील ( वय – ६१ ) सेवानिवृत्त राहणार करंजगाव, सरपंच सागर फुला सोनवणे ( वय – ३०) यांनी संगणमताने वेळोवेळी शासनाकडून येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनतेला न पोहोचविता या योजनांमध्ये शासनाकडून प्राप्त निधीचा अपार व भ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची तक्रार न्यायालयात केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.