रेल्वे पोलिसांच्या तपासणीत उघड
भुसावळ ( प्रतिनिधी ) – सुरक्षा बलाचे सहायक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावलदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी दि. ४ रोजी तपासणी करीत होते. रेल्वेच्या मागील जनरल डब्यामध्ये श्वान वीरूला दोन संशयित बॅग आढळून आल्या. एका बॅगमध्ये कपडे, तर दुसऱ्या बॅगमध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये २४ किलो गांजा आढळून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षा बळाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी गांजा जप्त केला.
मलकापुरवरून भुसावळ रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर गांधीधाम रेल्वे पोहचली असता, भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, गोपनीय विभागाचे सुरेश भगत, अवधेश कुमार, अमोल पाटील, यांनी जनरल डब्यात प्रवेश केला. सीट क्रमांक २२ ते २५ वर दोन बेवारस बॅग आढळून आल्या. बॅग उघडली असता, आंबट उग्रवास आला व बीज असलेला २४.५२५ किलो ओला गांजा आढळला. त्याची किंमत २,४५,२५० रुपये आहे.
नायब तहसीलदार शोभा राजाराम घुगे यांच्यासमोर गांज्याची मोजमाप करण्यात आले. ही कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवासन राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी. पी. कुशवाह यांच्या आदेशावरून निरीक्षक राधा किशन मीना यांनी केली.