जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कुल येथे चोरी करून कागदपत्रांचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ३ संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी दिली असून एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
निषादराज रंगराव बारी (वय २८, रा. शिरसोली ता. जळगाव) हे पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिक्षक आहेत. त्यांच्या विद्यालयात ६ जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून कार्यालयातील कागदपत्रांचे नुकसान केले. तर बॅटरी, इलेक्ट्रिक मोटार, १५ हजार रोख असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला ७ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु होता.
पोनि जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, हि चोरी शिरसोली गावातीलच अजय भिल (वय २२), किरण कोळी (वय २१), मयूर बारी (वय १८) यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरून तिघे संशयिताना १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. तर न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयितांकडून काही मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली.
सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, पोलीस नाईक समाधान टहाकळे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, यशोधन ढवळे, सचिन पाटील, सुधीर साळवे, योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे. आरोपींकडून शिरसोली परिसरातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.