राज्य शासनाचा निर्णय झाला लागू
जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुषमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून राज्यातील सर्वच घटकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तब्बल १३५६ आजार या योजनांमध्ये समाविष्ट केले आहेत. यामध्ये मूत्रपिंडावरील शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाखांची तरतूद आहे. या नव्या निर्णयामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाकडून मिळणारी वैद्यकीय बिले बंद होतील, त्यातून दरवर्षी तब्बल अडीच ते साडेतीन हजार कोटींची बचत होईल, अशी माहिती सरकारी आस्थापनांकडून मिळाली आहे.
योजनेतर्गत सर्वसामान्यांना दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांत ही योजना राबविली जात आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांचे आरोग्य विमा कवच मिळते. मात्र, या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा ज्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच लाभ मिळतो. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही. त्यामुळे अनेकजणांना योजना असूनही लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन निर्णय घेत शिधापत्रिका नसली तरीदेखील. उपचार देण्याची तरतूद केली आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत आता शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला असून, त्यांना उपचारावेळी शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.
शिधापत्रिका नसलेल्यांना रहिवासी दाखला द्यावा लागणार आहे. पूर्वी योजनेत राज्यातील एक हजार खासगी, शासकीय व सहकारी रुग्णालयांचा समावेश होता. आता प्रत्येक तालुक्यात दोन रुग्णालये असतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
कोण असणार लाभार्थी ?
गट-अ : पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब
गट-ब: शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब (शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांसह) व शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंब
गट-क : गट अ आणि बमध्ये समाविष्ट न होणारे शासकीय, शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत व महाराष्ट्राबाहेरील बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब.
गट-ड : महाराष्ट्र व सीमाभागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण.