नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्य शासनाने सशर्त परवानगी दिल्याने शहरामधील परप्रांतीय मजुरांची गावाकडे जाण्यासाठी घालमेल सुरू झाली आहे. प्रशासकीय अडचणींवर मार्ग काढीत दूध टॅंकर, ट्रक, रुग्णवाहिका तसेच सिमेंट मिक्सर तर रात्री-अपरात्री पायपीट करीत ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. पोलिसांनी अडवले की, विनवणी नाहीतर चिरीमिरीवर सुटका करून पुढचा प्रवास करायचा, अस करीत गाव गाठायचे. असे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मुंबई, पुणे शहरातून सोलापूर, बार्शी, पंढरपूर, उस्मनाबाद असा दूरचा प्रवास करणाऱ्या या लोकांना कडेकोट बंदोबस्त असतानाही रोखले जात नाही, असा प्रश्न समोर येत आहे. नाक्यावर ‘चिरीमिरी’चा व्यवहार झाला की, प्रवासी वाहतूक करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पुढे जाण्यास हिरवा सिग्नल मिळतो.
दुधाच्या रिकाम्या टॅंकरमध्ये बसून प्रवासाची तयारी प्रवासी दाखवत आहेत. जीव गुदमरायला लावणारा हा प्रवास असला तरी गावी सुरक्षित पोहोचू, असा विश्वास त्यांना वाटत आहे. रुग्णवाहिका चालकास अव्वाच्या सव्वा किंमत मोजून, प्रसंगी रुग्ण असल्याचे नाटक करून प्रवास करणारेही आढळून आले आहेत. धान्य, भाजीपाला, फळ, औषध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला मोबदला देऊन गाव जवळ करण्याच्या ओढीने अनेकांचा प्रवास सुरू आहे.
काही सेवाभावी संस्था, संघटना जेवणामध्ये फक्त खिचडी भात देतात, तोही पुरेसा नसतो. उपनगर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी अन्नदान सुरू आहे. मात्र, फक्त फोटोगिरीसाठी असे कार्यक्रम घेतले जात आहेत. दोन फुलके, भाजी, वाटीभर भात आणि वरण असा मेनू असतो, त्यातून पोट भरत नाही. त्यामुळे असे जेवण करीत करोनाच्या संकटात राहण्यापेक्षा गाव गाठलेले बरे, असे गावी निघालेल्यांनी सांगितले.







