जळगाव (प्रतिनिधी) – एसटी चालकाने थांब्यापासून काही अंतर लांब एसटी बस उभी केली. तसेच प्रवासी बसवण्यास नकार दिल्याचा आरोप करीत पंचायत समिती सभापती नंदू पाटील यांनी चालक, वाहकास शिवीगाळ करून धमकी दिली. चार तासांच्या नाट्यानंतर पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी दुपारी १२ वाजता शिरसोली गावात हा प्रकार घडला.
जळगाव आगाराची एसटी बस (एमएच-१९, बीएल-०९५७) ही बांबरुड येथून जळगावी येत होती. शिरसोली गावात बसस्टॉप परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे बसचालक जयवंतराव भगवान पाटील यांनी काही अंतर पुढे जाऊन बस थांबवली. याचा राग आल्यामुळे पंचायत समिती सभापती नंदू पाटील यांनी दुचाकी अाडवी लावून बस रोखली. चालक पाटील यांच्यासह वाहक अजय गणपत पाटील यांना शिवीगाळ केली. हा वाद मिटल्यानंतर बसचालक पुढे निघून गेले. यानंतर पुन्हा नंदू पाटील यांनी दुचाकीवर दिव्यांग प्रवासी बसवून पुन्हा बस रोखली. बसचालक पाटील यांनी दिव्यांग प्रवाशाला बसू दिले नाही, असा आरोप करीत पुन्हा धमकी दिली. हे प्रकरण तापल्यामुळे थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. चार तासांनंतर अखेर बसचालक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.