जळगावातील पिंप्राळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वेच्या धक्क्याने रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंप्राळा हुडको सबस्टेशन जवळ शनिवारी १ जुलै रोजी रात्री घडली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय नारायण जाधव (वय-५८) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. पिंप्राळा हुडकोमधील बौध्द वसाहतीत संजय जाधव हे आपल्या पत्नी, मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. प्रवाशी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी १ जुलै रोजी रात्री उशीरा संजय जाधव हे शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. पिंप्राळा हुडकोतील सबस्टेशनजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१७च्या २८ ते २६ दरम्यान अज्ञात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला.
जळगाव रेल्वेचे उपप्रबंधक यांनी ही माहिती रामांनद नगर पोलीसांना कळविली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी निलेश पाटील करीत आहे.