पेरणीयोग्य पावसाची अद्यापही प्रतीक्षा
जळगाव (प्रतिनिधी) – यंदा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जून महिना निराशाजनक ठरला आहे. महिना संपला, तरी अद्याप पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. जून महिन्यात केवळ सहा दिवस पाऊस झाला, अपुरा पडल्यामुळे यामुळे जमिनीत केवळ कोरडी ओल निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी आता पावसाच्या भरवशावर पेरण्यांना सुरवात केल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच दर वर्षी चांगला पाऊस येतो. यंदा मात्र पावसाने जूनमध्ये तब्बल २६ दिवस उशिराने हजेरी लावली, तेही तुरळक स्वरूपात. काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला. अद्याप जोरदार, पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. चांगला पाऊस झाला, की पेरण्या करू, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
पुणे, मुंबई, नाशिकला दमदार पाऊस हजेरी लावत आहे. जळगाव जिल्ह्यात दमदार नाही. मात्र, पेरणीचे दिवस कमी होत असल्याने शुक्रवारपासून जिरायतदार शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या. इतर ठिकाणी पाऊस पडतो. आपल्याकडेही पाऊस पडेलच, अशी आशा त्यांना आहे. आता उडीद, मुगाच्या पेरण्या करता येणार नाहीत. कारण ही पिके जेव्हा परिपक्व होतील तेव्हा पावसाचा वेग वाढला तरी पिके वाया जातील.
उडीद, मूग वगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला पाहिजे. बागायतदार शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७० ते ८० हजार हेक्टरवर पेरण्या केल्या आहेत. ज्यांच्याकडे पाणी आहे ते पेरण्या करू शकतात. मात्र, ज्यांच्या शेतात पाणी नाही, त्यांना पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे.पावसाने दडी मारली असली तरी काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. आता उडीद, मूग ही पिके घेता येणार नाहीत. इतर पिके पावसाचा अंदाज घेऊन घ्यावीत, आतापर्यंत झालेल्या पावसाने जमिनीत सध्या तीन इंचांची ओल आहे. किमान सहा इंच तरी ओल जमिनीत झाली पाहिजे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.