पहूर येथील पतीचा कारनामा, गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पहूर पेठ येथील घटनेत पतीवर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ जेवण उशिरा दिले याचा राग आल्याने पतीने पत्नीवर चाकूहल्ला केला. त्यानंतर स्वतःच्या पोटावर देखील चाकू मारण्याचा प्रयत्न केला. घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.
शेवंताबाई रामकृष्ण बुंदे (वय ५०, हनुमान मंदिर रॊड, पहूर पेठ, ता. जामनेर) असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर जखमी पती रामकृष्ण बुंदे (वय ५५) याने २३ जून रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास जेवण मागितले. त्यावेळी जेवण उशिरा दिल्याचा रामकृष्णला राग आला. त्याने संतापात पत्नी शेवंताबाई हिला पोटावर व पाठीवर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःलाही चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घटनेत दोघी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती स्थिर झाल्यावर शेवंताबाई हिने पहूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पती रामकृष्ण बुंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अमोल गर्जे करीत आहेत.