शोधकार्यात जंगलात मिळाला प्राणी, पोलीस दल अजूनही अंधारात
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील बेपत्ता इसमाचा अद्यापही मृतदेह मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत. पोलिसांनी मारेकरी, खुनातील हत्यार, कपडे शोधले. मात्र मृतदेह शोधण्यात अद्यापही अंधारातच आहे. मारेकरी एकच ठिकाण सांगत आहे. मात्र मृतदेह तेथे नसल्याने आता नातेवाईक स्वतःच मृतदेहाच्या शोधला लागले आहेत. शनिवारी त्यांनी तर, ढालगाव जंगल, हिंगणा जंगलात शोधले. तेथे एका विहिरीत संशयावरून तपासले. त्यात मात्र मृत प्राणी निघाला. पोलीस दल अंधारातच असल्याने प्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहे.
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील बेपत्ता इसम कैलास पाडळे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मयत इसमाच्या एका मित्राला ताब्यात घेतल्यावर त्याने खुनाची कबुलीदेखील दिली होती. तसेच गुन्ह्यातील कुऱ्हाड, दगडही काढून दिला. मयताचे कपडे, मोबाईल व इतर वस्तूपण मिळाल्या. मात्र संशयित आरोपीने दाखविलेल्या जागेच्या ठिकाणी मृतदेह मिळाला नाही. मग हा मृतदेह गेला तरी कुठे ? अन्यथा मारेकरी खोटे बोलत असेल तर त्याच्याकडून मृतदेहाबाबत पोलिसांना माहितीच का मिळत नाही ? असा सवाल नातेवाईक करीत आहेत.
शनिवारी २४ जून रोजी नातेवाईकांनी ढाळसिंगी जंगल शोधत, हिंगणे जंगलाकडे देखील तपासले. हिंगणा जंगलातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका विहीरीत एका गोणपाटात मृतदेह आढळला. हा मृतदेह मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आला. मात्र त्या गोणपाटात अन्य प्राण्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे नातेवाईकांच्या निराशेत वाढ झाली. मात्र पोलिसांबद्दल नाराजी कायम राहिली. महिनाभर पहूर पोलीस बेपत्ता वडिलांचा कुठलाच शोध घेत नाही हे पाहून कैलास वडाळे यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी याबाबत तपास एलसीबीला करण्याचे सांगितले होते. मात्र मृतदेह शोधण्याचे आव्हान एलसीबी अद्यापही पेलू शकलेली नाही.