जळगाव शहरातील समता नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील समता नगर येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी सकाळी समता नगर मध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित घटना टळली. दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे.
आकाश उर्फ सनी दादाराव अडकमोल (वय ३०, रा. समता नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी दि. २४ जून रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांना समता नगर परिसरात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीची संशयास्पद हालचाल दिसली. त्यांनी मोठा भाऊ सचिन अडकमोल आणि घराजवळ राहणारे कुलदीप आढाळे यांना माहिती दिली. सदर संशयित व्यक्ती ही महापुरुषांच्या पुतळाजवळ काहीतरी हार टाकताना दिसली. नंतर तो पळू लागला.
फिर्यादी व इतर दोघांनी सदर इसमाला उजेडाच्या प्रकाशात पाहिले असता तो पूर्वी समता नगरातच राहणारा गोकुळ हंसराज राठोड (वय ५५ रा. आदर्श नगर, जळगाव) हा दिसला. त्यांनी त्याला पकडून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तारचे कंपाउंड ओलांडून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
यानंतर समता नगरातील सर्व समाज बांधव गोळा झाले. त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित यांनी देखील भेट दिली.
तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार गोकुळ हंसराज राठोड याचा शोध सुरू केला. काही तासानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी जमावाने गर्दी केली होती.
पोलिसांनी शिताफीने रुग्णालयातून त्याला न्यायालयात हजर केले आहे. दरम्यान आकाश अडकमोल यांचे फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परिसरात आता तणावपूर्ण शांतता आहे.
काही दिवसांपूर्वी संशयित गोकुळ राठोड याच्या मुलाला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या रागातून त्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना दिलेल्या धमकीतून त्याने महापुरुषांची विटंबना करण्याचा प्रकार केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.