जळगाव (प्रतिनिधी) – येथील छ. संभाजीनगर रस्त्यावर एका ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारा दुचाकीस्वार ट्रकवर धडकला. यात दुचाकीवरील पितापुत्र जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शंकर नारायण जंजाळ (वय ५८, रा. टाकळी ता. जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे. ते सोमवारी १९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास छ. संभाजीनगर रस्त्यावरून जात असताना पुढे चालत असलेल्या ट्रक चालकाने (क्र. टीएन ३० बीएल २६४७) याने अचानक ब्रेक लावून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागून दुचाकीवर (क्र. एमेच १९ ६२५३) ने येत असलेले फिर्यादी शंकर व त्यांचा मुलगा सचिन हे ट्रकवर मागील बाजूस आदळले.
त्यात ते दोघे जबर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यानंतर शंकर जंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला ट्रकच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अनिश शेख करीत आहेत.