पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
योगेश वाघे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान योगेश वाघे हे २० जूनला नेहमीप्रमाणे शेतात गेले. धाकटेगाव शिवारातील गट नंबर १२२४ मधील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.
यानंतर त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत वाघे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, एक मुलगी असा परिवार आहे.