जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक योग दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सकाळी योगा प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच, १८ पोस्टर प्रदर्शन व रांगोळीदेखील काढून परिसर सुशोभित करण्यात आला होता. प्रसंगी प्राध्यापक, डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके शिकून घेतली.
देशभरात जागतिक योगा दिन बुधवारी साजरा करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय परिसरात योगा प्रात्यक्षिके घेण्यात आली. आयुष विभागाचे योग शिक्षक अनंत महाजन व डॉ. रवी हिरानी यांनी प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेतली. यात अनुलोम, विलोम, त्रिकोणासन, वज्रासन, शवासन, प्राणायाम, पद्मासन, ताडासन आदी प्रकार घेण्यात आले.
यानंतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. जोतीकुमार बागूल, सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र अग्रवाल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब सुरोशे, कार्यक्रम समन्वयक सहा. प्रा. डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. आकाश चौधरी, डॉ. मोईन खान मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रस्तावनेत, डॉ. जोतीकुमार बागूल यांनी, योगा दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती सांगितली.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी, योगा दररोज अर्धा तास केला तर दिवस ताजातवाना जातो. आपल्या जीवनशैलीत योगाला समाविष्ट करा. जीवन जगण्यासाठी दर्जेदार शैली हवी. ती योगामुळे मिळू शकते, असे सांगितले. यावेळी सूत्रसंचालन अनंत महाजन यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. गोपाळ डव्हळे, विश्वजीत चौधरी, राकेश सोनार, अजय जाधव, प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, परिचर्या महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.