औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान शहरासाठी एक दिलासादायक बातमीही आहे. अतीगंभीर अवस्थेतील एक 38 वर्षीय कोरोना रुग्ण बरा झाला आहे. या तरुणाला डिस्चार्ज मिळाला आहे. ही औरंगाबाद शहरासाठी ही दिलासादायक बातमी आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गुरुवारी एका 38 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाला सुटी देण्यात आली. पहिल्यांदा घाटीमधील कोरोनाचा अतीगंभीर अवस्थेतील रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. यावेळी डॉ. कानन येळीकर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाचे पुषगुच्छ देत टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. सबंधित रुग्ण हा समता नगरमधील आहे. 20 एप्रिलला त्यांना अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डिस्चार्ज रुग्णांची संख्या आतापर्यंत 29 झाली आहे.
दरम्यान आज सकाळीही शहरात 17 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ही 373 वर गेला आहे. औरंगबादकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. शहरात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होतेय. शहरवासियांमध्ये यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.