नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले हजारो भारतीय आता मायदेशी परतणार आहेत. परदेशातून त्यांना आणण्यासाठी 60 हून अधिक विमानं पाठवण्यात आली होती ती आज मायदेशी परतणार आहेत.

12 विविध देशांमध्ये अडकलेले जवळपास 15 हजार भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं पुढच्या काही दिवसांमध्ये परत आणलं जाणार आहे.
या प्रवाशांना प्रवास भाडं द्यावं लागणार असून भारतात पोहचल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. विमान आणि नौसेनेच्या जहाजांनी त्यांना परत आणण्यात येणार आहे.
भारताकडून लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी मार्चमध्येच सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून केवळ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी काही उड्डाणं सुरु केली. पण मोठ्या संख्येने परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची ही वंदे भारत मोहीम आतापर्यंतच्या मोहिमांपैकी सर्वात मोठी नियोजित मोहीम आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार साधारण 2 लाख भारतीयांना परत आणलं जाईल. जर ही मोहीम यशस्वी झाली तर 1990 नंतर भारताने राबवलेली सगळ्यांत मोठ्या स्थलांतराची मोहीम ठरेल. 1990 मध्ये आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असताना तब्बल 1 लाख 70 हजार भारतीयांना कुवेतमधून परत भारतात आणलं गेलं होतं.







