जागतिक सायकल दिनानिमित्त डॉ. अनघा चोपडेंची जनजागृती
महिला, तरुणांसाठी सायकलिंगचे फायदे मोठे
जळगाव (प्रतिनिधी) : सायकलिंग हा उत्तम क्रीडा प्रकार आहे. तरुण मुलामुलींनी या क्षेत्रात पुढे आले पाहिजे. सायकलिंगमुळे शरीराला अनन्यसाधारण फायदे होत असतात. नियमित सायकलिंग केल्यामुळे व्यायाम तर होतोच, मात्र शरीराचे आरोग्यदेखील उत्तम राहते. तसेच आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दिवसातून एकदा तरी सायकल चालवावी, असे आवाहन डॉ. अनघा चोपडे यांनी ‘केसरीराज” च्या माध्यमातून जळगाववासीयांना केले आहे. आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त त्यांनी “केसरीराज” च्या माध्यमातून नागरिकांना जनजागृतीपर माहिती दिली आहे.
दरवर्षी ३ जून हा आंतरराष्ट्रीय सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. शहरात डॉ. अनघा चोपडे ह्या पॅथॉलॉजिस्ट असून उत्तम सायकलपटूदेखील आहेत. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी सायकलिंग शिकली. सायकल शिकण्यात गंमत आली. आता २०२० पासून नियमित सायकलिंग त्या करीत आहे. सुरुवातीला ६ किमी पासून सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत त्यांनी २००, ३००, ४०० किमी सायकलिंग राईड पूर्ण केली आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांनी ६०० किमी राईडदेखील पूर्ण करून दाखविली. त्यामुळे सर्व सायकलिंग सिरीज एका कॅलेंडर मध्ये करून दाखविणाऱ्या त्या जळगावची पहिली महिला ठरल्या आहे. त्यांना सुपर रॅडोनियर हा पुरस्कार मिळाला.
डॉ. अनघा चोपडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव ते शेगाव हि १५० किलोमीटरची विशेष सायकलिंग राईड ४२ ते ४५ अंश सेल्सियसच्या तापत्या उन्हात पूर्ण केली आहे. तसेच, विविध स्पर्धेत उत्कृष्ट सायकलिंग केल्याबद्दल अनेक पारितोषिक त्यांना मिळाले आहे. नाशिक येथील आयएमए आयोजित ५० किमी सायकलिंग शर्यत जिंकून प्रथम क्रमांक मिळविला होता. राज्यात अनेक ठिकाणी तसेच, राजस्थान, उत्तरप्रदेश याठिकाणी त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी जनजागृतीच्या उद्देशाने सायकलिंगविषयी माहिती सांगितली आहे. ३ जूनला नवीन पिढीला आणि सर्व घटकांना सायकलिंगची माहिती मिळणे मह्त्वाचे आहे. यासाठी सायकल रॅली देखील काढले जाते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सायकलिंगसाठी वेळ काढलाच पाहिजे, अशी माहिती डॉ. अनघा चोपडे यांनी दिली आहे.
मेनोपॉजनंतर मात्र महिलांनी हदयाची काळजी विशेष स्तरावर घेणं आवश्यक आहे. ही गरज सायकलिंग केल्यानं भागते. सायकल चालवल्याने हदयरोगाचा धोका कमी होतो. सायकल चालवताना शरीराला एक लय येते. तीच लय हदयाच्या ठोक्यांनाही येते. आणि श्वासांवरही नियंत्रण करायला जमतं. सायकलिंग करताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास सायकलिंगमुळे मदत होते. महिलांना सर्वात जास्त धोका स्तनांच्या कर्करोगाचा असतो. हा धोका जेव्हा शरीराची हालचाल पुरेशी होत नाही तेव्हा जास्त असतो. पण सायकलिंगमुळे संपूर्ण शरीर सक्रीय होतं. एका अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो की मेनोपॉजनंतर सायकलिंगसारखा शरीरास सक्रीय करणारा व्यायाम नियमित केल्यास स्तनांच्या कर्करोगाचा धोका टळतो.
सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्त्वाचा मुख्य स्त्रोत आहे. सूर्याच्या कोवळ्या उन्हांपासून ड जीवनसत्त्वं मिळतं. मोकळ्या हवेत सकाळच्या वेळेस सायकलिंग केल्यास आपल्या शरीरात ड जीवनसत्त्वं मुरायला मदत होते. ड जीवनसत्त्वं मिळाल्यानं निराश उदास मनही प्रफुल्लित होतं. शरीरास पुरेसं ड जीवनसत्त्वं मिळाल्यास वेगवेगळ्या आजारांविरुध्द शरीराची लढण्याची, त्याला प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. सायकलिंगमुळे शारीरिक व्यायाम आणि ड जीवनसत्त्वाचा लाभ असा दुहेरी फायदा होतो, असेही त्यांनी “केसरीराज” च्या माध्यमातून सांगितले आहे.
सायकलिंग हा एक विरंगूळा आहे, मजा आहे. मनाला उत्तेजित आणि उत्साहित करणाऱ्या या व्यायामनं अॅड्रेनालिन आणि एंड्रोफिन्स हे संप्रेरकं चांगली स्त्रवतात. त्याचा परिणाम म्हणजे मूड सूधारतो. आनंदी वाटतं. त्यामुळे अजूनही सायकलिंग टाळत असाल तर उठा आणि उद्यापासून सायकल चालवायला लागा!
शरीराची ताकद वाढवते सायकलिंग
“सायकलिंग केल्यानं शरीराचं तापमान वाढतं. त्याचा परिणाम म्हणजे घातक जिवाणूंना आत येण्यास शरीर रोखतं. रोज १५ ते २० मिनिटं सायकल चालवली की शरीर वेगवेगळ्या संसर्गाशी ताकदीनं लढतं. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते अन रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर शरीराची ताकदही वाढते.””
– डॉ. अनघा चोपडे, सायकलिस्ट