दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांचे शोध मोहीम जोरात
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत आज गुरुवारी अज्ञात दरोडेखोरांनी सकाळी टाकलेल्या जबर दरोड्यात तब्बल १७ लाख १० हजार ३७० रुपये रोख आणि ३ कोटी ६० लाखांचे बँकेत तारण ठेवलेले सोन लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ असलेल्या स्टेट बँक शाखेत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी मागच्या दरवाजाने प्रवेश केला. सकाळची वेळ असल्याने बँकेत कर्मचारी वगळता जास्त लोकं नव्हती. कोयत्यासारखे धारदार शस्त्राच्या धाकावर दरोडेखोरांनी व्यवस्थापकासह बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. आणि अवघ्या काही मिनिटात साधारण १७ लाखाची रोकड आणि सोन्याचे ३ कोटी ६० लाखांचे दागिने लुटून पोबारा केला. दरम्यान, दरोडेखोरांनी व्यवस्थापकांवर चाकुने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
सदर दोन्ही चोरट्यांनी डोक्यात काळे हेल्मेट घातलेले होते. एक जाड इसम हा ३५ ते ४० वयोगटातील होता तर दुसरा मध्यम शरिरीचाचा ४० ते ४५ वयोगटाचा होता. दोघांनी काळे कपड़े परिधान केलेले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, जिल्हापेठचे बबन आव्हाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. शहरातील काही भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले असुन यात दरोडेखोरचे छायाचित्र आले आहे .
बँकेचे व्यवस्थापक यांचीच मोटर सायकल घेऊन दरोडेखोर आणि पोबारा केला आहे व कर्मचाऱ्यांचेही मोबाईल आणि बँकेतील डीव्हीआर घेऊन देखील पळ काढला आहे. बँकेचे व्यवस्थापक राहुल मधुकर महाजन यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत