जळगाव ( प्रतिनिधी ) – म्हसावद येथील ३५ वर्षीय तरूणाचा बाजरीचा कट्टा दुचाकीवरून घेवून जात असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नागदूली ते पद्मालय मंदीराच्या प्रवेशद्वारदम्यान मंगळवारी ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश पंडीत गायकवाड (वय-३५) रा. म्हसावद, ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे योगेश गायकवाड हा तरूण पत्नी सुरेखा आणि चार मुलांसह राहायला होता. शेती व सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता एरंडोल येथून योगेश हा दुचाकीवरून बाजरीचा कट्टा घेवून म्हसावद येथे येण्यासाठी निघाला होता. दरम्यान, नागदुली ते पद्मालय मंदीराच्या प्रवेशद्वार रस्त्यावरील वळणावरून जात असतांना अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट निंबालाच्या झाडावर आदळली. या अपघातात योगेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. बुधवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.