जळगाव (प्रतिनिधी) – शहरात चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा विद्यार्थ्यांच्या खोल्यांकडे वळवला आहे. रामानंदनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन विद्यार्थिनींच्या खोलीतून मोबाईल लांबवल्याची घटना घडल्यानंतर आता रिंगरोडवर देखील अशीच घटना घडली आहे. शहरातील रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत अभियंता असलेल्या तरुणाच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळसह रोकड लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळा येथील मूळ रहिवासी सौरभ अनिल वाळेकर हा तरुण जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत वास्तव्यास आहे. तो अभियंता आहे. दरम्यान सोमवारी दुपारी ३ ते ६ वाजेच्या दरम्यान सौरभ हा झोपला असताना, त्याच्या खोलीतून त्याचा लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ तसेच अडीच हजार रुपये रोख असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. सायंकाळी ६ वाजता उठल्यानंतर सौरभला, त्याचा खोलीत ठेवलेला मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ तसेच रोकड दिसून आली नाही.
चोरीची खात्री झाल्यावर सौरभ याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख हे करीत आहेत.