सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला गुजरात राज्यातील भावनगर येथून रविवारी २८ मे रोजी रात्री १० वाजता जळगाव सायबर पोलीसांनी अटक केली.
रावेर तालुक्यातील एकाला ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख ३० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली होती. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी फिर्यादीचे व्हॉटसॲप आणि बँकेतील झालेले व्यवहारच्या मदतीने संशयित आरोपी हा गुजरात राज्यातील भावनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ प्रविण वाघ, दिलीप चिचोले, पो.कॉ गौरव पाटील अशा पथकाला रवाना केले.
पथकाने संशयित आरोपी विजय उर्फ अजय दयाभाई कलसरीया (वय-३३) रा. अम्रेली, भावनगर, गुजरात याला रविवारी २८ मे रोजी रात्री १० वाजता अटक केली. त्याच्याकडून फसवणूकीपैकी ५ लाख रूपये हस्तगत केले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.