पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोलाणे येथे चोरटयांनी धुमाकूळ घालून दोन व्यक्तीच्या घरात तसेच पोस्ट ऑफिस येथे घरफोडी करून एकूण २ लाख ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोलाणे येथील शेतकरी भगवान विठ्ठल पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २५ मे रोजी रात्री ८ वाजेनंतर कधीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरात घुसून १ लाख ९५ हजारांचे दागिने व ५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच गावातील परमेश्वर हिरामण पाटील यांच्या घरात घुसून ४३ हजार ५०० रुपयांचे दागिने, साड्या व १० हजार रुपये रोख चोरून नेले. याशिवाय गावातील पोस्ट ऑफिसच्या दरवाज्याची कडी कोंडा तोडुन प्रवेश करीत ३१ हजार ८०० रुपये रोख चोरून नेले आहे.
तसेच, गावातील कैलास अर्जुन करंजे व सुभाष धना पाटील यांच्या घराचा कड़ी कोंडा तोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानुसार पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि राजू जाधव हे करीत आहेत.