भुसावळ (प्रतिनिधी) – इमारतीचे बांधकाम करत असताना आसारीवर नेत असतांना महावितरण कंपनीच्या विजेच्या तारांना आसारीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय मजूर तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुशील भुवानसिंग आखाडे (वय-२१, रा. खंडवा मध्य प्रदेश, हल्ली मु. सोमानी गार्डनजवळ भुसावळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ शहरातील विद्यानगरात वेडीमाता मंदिराजवळ राहणारे गेंदालाल देविदास चौधरी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी सुशील भुवानसिंग आखाडे हा कामाला होता. शुक्रवारी २६ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खालच्या घरातून लोखंडी असारीवर नेत असताना आसारीला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने सुशीलला विजेचा शॉक लागला त्यातच त्याला जागीच मृत्यू झाला. त्याला भुसावळ ग्रामीण रुग्णाला दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार अनिल चौधरी करीत आहे.