जळगाव (प्रतिनिधि) : तालुक्यातील कानळदा येथे एका तरुणाला लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवित असताना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याला जिल्ह्यातून दोन वर्षं करिता हद्दपार करण्यात आलेले आहे. तरीही तो गुन्हा करताना आढळून आला, म्हणून त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश इच्छाराम सपकाळे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो कानळदा येथे राहतो. तालुका पोलिसांना माहिती मिळाली की, कानळदा येथील एका चौकात सार्वजनिक जागेवर आकाश सपकाळे हा लोखंडी तलवार घेऊन फिरत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन खात्री केली होती. त्या ठिकाणी आकाश सपकाळे हा तलवार घेऊन फिरताना दिसला.
त्याच्यानुसार त्याला ताब्यात घेऊन पोलीस कर्मचारी प्रशांत ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सपकाळे हा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार झालेला आहे. हद्दपार झालेला असताना सुद्धा जिल्ह्यात अनधिकृत पणे प्रवेश करून तो गुन्हा करताना मिळून आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहेत.