जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यात सोनाळा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता इसमाचा शोध घेताना पोलिसांना त्याचा सापळाच मिळाला. तपासाअंती, तो ८ दिवसांपासून पाटाच्या पाण्यात पडून मयत झाला होता. दरम्यान, त्याला अज्ञात जनावरांनी कुरतडून खाल्ल्याचे उघड झाले आहे. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भारत कौतिक पाटील (वय ४१, रा. भराडी, ता. जामनेर) हे १२ मे पासून घरातून सोनाळा येथे जातो सांगून गेले, ते परतलेच नव्हते. १५ मे रोजी त्यांची बेपत्ता झाल्याची खबर नोंदविण्यात आली होती. पोलिसांचा तपास सुरु होता. दरम्यान, सदर इसम, सोनाळा गावाकडे पाटाच्या पाण्यातुन जात असताना पाय घसरून पडला होता. त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नव्हते. त्यांना दारू पिण्याची सवय होती.
शनिवारी २० मे रोजी पोलिसांना पाटात अनोळखी सापळा असलेला मृतदेह मिळून आला होता. त्यावर असलेले कपडे व खिशातील पाकिटात असलेले कागदपत्रांवरून मृतदेह बेपत्ता असलेले भारत कौतिक पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान, मृतदेह अज्ञात जनावरांनी कुरतडून खाल्ल्याचे दिसून आले आहे. त्यांचा पुतण्या अतुल पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रदीप चौधरी करीत आहे.