जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्भाशयाच्या गाठीमुळे त्रस्त महिलेला वाचविण्यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाला यश आले आहे. त्यांच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच दिवशी महिलेला चालता फिरता येऊ लागले. या महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून नुकताच निरोप देण्यात आला आहे.
कमलाबाई गणेश चौधरी (वय ५५, रा. धरणगाव) या महिला अतिशय रक्तस्त्राव होण्यामुळे तपासणीसाठी आल्या होत्या. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तसेच गर्भाशयात गाठ असण्याचे निदान डॉ मिताली गोलेच्छा यांनी केले. त्यामुळे त्यांचे पोट ७ महिने गरोदर असलेल्या स्त्रीसारखे दिसत होते. तसेच अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी झाले होते. त्यांना रक्ताच्या ३ पिशव्या लावण्यात आल्या. यांच्यावर दुर्बिणीद्वारे अत्यंत गुंतागुतीची असलेली डॉ. मिताली गोलच्छा यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटातून ३ किलोची गर्भाशयाची गाठ काढण्यात आली. दुर्बिणीद्वारे एवढी मोठी गाठ काढण्याची ही जळगावच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालय येथील पहिलीच वेळ आहे.
दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. केवळ ३ टाक्यात अवघ्या १ से मी च्या चीरेतुन ही शस्त्रक्रिया झाली. रुग्णाला लगेच शस्त्रक्रिया झालेल्या दिवशीच चालता येऊ लागले .या मिळालेल्या अत्याधूनिक सुविधेमुळे रुग्ण समाधानी होते व त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. त्यामुळे महिलेला दिलासा मिळाला. शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आली. उपचारासाठी डॉ. मिताली यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे, डॉ अमृता दुढेकर यांनी सहकार्य केले. डॉ. राहुल कत्तखडे, डॉ. रणजित पावरा,डॉ. विनेश पावरा, डॉ पूजा वाघमारे, डॉ. पूजा बुजाडे, डॉ वैष्णवी नीलवर्ण, यांचेसह परिचारिका निला जोशी, रत्नप्रभा पालीवाल यांनी परिश्रम घेतले.
महिलेला रुग्णालयातून नुकताच अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे उपस्थितीत निरोप देण्यात आला. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी केले. नुकतेच रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियाचे शतक पूर्ण झालेले आहे.