जळगाव (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत एप्रिल महिन्यात कालावधीत सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोहीमेत जळगाव जिल्ह्यातील ७ हजार ८५९ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव बी. यु. खरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

उपक्रमांतर्गत इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्यावतीने विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून २ हजार ९१८ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आले तर जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांचेकडून ४ हजार ९४१ जात दाखले निर्गमित करण्यात आले.
ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रीकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याचेही जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ते अर्ज अपलोड केलेल्या मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत स्वत: किंवा वडिल/भाऊ/बहिण/आई यांनी समक्ष जमा करावेत. जेणेकरून त्याचे प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील, असे आवाहनही खरे, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.








