चाळीसगाव (प्रतिनिधी) – घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून टेबलावरील मोबाईल घेऊन पळ काढताना घरमालकाने अडवताच चाकुचा धाक दाखवत दुस-या मजल्यावरुन खाली उडी घेतल्याने चोर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास शाहूनगरातील आर के लॉन्सजवळ घडली.
कुल्फी व्यावसायिक अजय प्रेमसिंग राजपूत यांचा करगाव रोडवरील गणपती मंदिराजवळ कारखाना आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ते कारखान्यातून घरी आले. तेव्हा घराचा मुख्य दरवाजा त्यांना उघडा दिसला. त्यांना सोफ्यावरच झोप लागली. यानंतर दोन वाजेच्या सुमारास बैठक खोलीत कुणीतरी आल्याचा आवाज आला. त्यामुळे राजपूत झोपेतून जागी झाले. तेव्हा एक जण चड्डीवर घरात येऊन टेबलावरील मोबाईल चोरत असल्याचे दिसले. त्याला राजपूत यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने चाकूचा धाक दाखवून पळ काढला.