अधिष्ठाता कार्यालयाच्या पत्रव्यवहारांना मिळाली केराचीच टोपली ?
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवार दि. २ मे रोजी शस्त्रक्रिया गृहामध्ये बाळ अदलाबदलीचा गोंधळ झाला होता. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली असली तरीही, रुग्णालयात मनुष्यबळ कमतरतेमुळे हा प्रकार घडला असल्याचे दिसत आहे. वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन मंत्रालयात पत्रव्यवहार करीत असूनहि तसेच, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत अनेकदा दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे हा गोंधळ होऊन दोन्ही बाळांच्या परिवाराला मनस्ताप झाल्याचे दिसून आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांच्या ४०० पैकी फक्त ४ जागा भरलेल्या आहेत. रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून सुमारे ६० ते ६५ परिचारिका ह्या ३५० ते ४०० रुग्णांच्या मागे कार्यरत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिचारिकांना कामाचा अधिक भार सहन करावा लागत आहे. अनेकदा तर एका कक्षात एकच परिचारिकेला काम करावे लागत आहे.
कामाचा भार कमी करण्यासाठी तसेच, प्रशिक्षण म्हणून परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मदत घेतली जात आहे. त्यांच्याकडून वॉर्डांमध्ये काम केले जात आहे. शस्त्रक्रियागृहात देखील नर्सिंग स्टाफला मदतीसाठी विद्यार्थिनींची मदत घेतात. स्त्रीरोग विभागातील सीझर होणाऱ्या बाळांना नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे काम परिचारिका करीत असतात. मात्र काही वेळा परिचारिका नसतील तर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी बाळ सुपूर्द करण्याचे काम करतात.
परिचारिकांसह डॉक्टरांच्या रिक्त जागा भरा म्हणून अनेकवेळा अधिष्ठाता कार्यालयाकडून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पत्रव्यवहार झालेला आहे. या पत्रव्यवहाराला वेळोवेळी केराचीच टोपली दाखविण्यात आली काय ? असं सवाल निर्माण झाला आहे. तसेच, कंत्राटी पद्धतीवर परिचारिका घेण्याबाबतही चर्चा झालेल्या आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातीलच असून त्यांच्याकडे परिचारिका संघटनांनी देखील निवेदन दिलेले आहे. तसेच, रिक्त मनुष्यबळ लवकरच भरले जाईल असे जाहीर भाषणात, मुलाखतीत गिरीश महाजन यांनी सांगितले होते. मात्र त्यासंबंधी कुठलाच निर्णय घेतला जात नसल्याने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ताण सहन करावा लागत आहे.