भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाडे-गुढे येथील २३ वर्षीय तरूण पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.
तालुक्यातील वाडे-गुढे गावातील रहिवासी गोविंद समाधान मोरे (वय २३) असे मयत युवकाचे नाव आहे. गोविंद हा युवक २७ एप्रिल गुरुवार रोजी तालुक्यातील खडकदेवळा येथील मावशीकडे आला असता रविवार. ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोविंद हा धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र गोविंद यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. घटना गावात कळाल्यानंतर परीसरातील पट्टीच्या पोहणार्यांनी गोविंदचा शोध घेतला असता गोविंदचा मृतदेह आढळून आला नाही. १ मे रोजी होडीच्या साहाय्याने पुन्हा शोध मोहिम सुरू केल्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोविंदचा मृतदेह आढळून आला.
गोविंद याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे. मयत गोविंद मोरे याच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, चार बहिणी असा परीवार आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.