जळगाव (प्रतिनिधी) – पत्नीला मारण्यासाठी हातात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या इसमाला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडले. पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी रोड येथे तो कोयता घेऊन फिरत असताना पोलिसांना त्याला पकडले.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सुभाष पाटील यांनी फिर्याद दिली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. त्यानुसार एक व्यक्ती पंचमुखी हनुमान मंदिराजवळ धारदार कोयता घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी जाऊन पडताळणी केली असता एक व्यक्ती कोयता घेऊन फिरत असल्याचे दिसले. त्याला त्याब्यात घेतले असता त्याने नाव सांगितले. प्रमोद शामराव सोनवणे (कोळी) (वय, ४३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, ह. मु. तरसोद ता. जळगाव) यांच्याकडे १७ इंच लांबीचा कोयता मिळून आला.
प्रमोद सोनवणे हा त्याची पत्नी कविता प्रमोद कोळी हिस मारण्यासाठी त्या परिसरात तिला शोधत होता, अशी माहिती पोलीस चौकशीत समजली आहे. त्याच्यावर आर्म ऍक्ट नुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.