जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील पार्वती नगर येथील सनराईज बार हॉटेल संदर्भात पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मंगळवार १८ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हॉटेल चालकावर रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोहर वासुदेव बंडाळे (वय-५४, रा. पार्वती नगर, जळगाव) हे आपल्या पत्नीसह राहायला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच भागात रवींद्र सुधाकर जगताप ( वय – ५२, रा. अजिंठा सोसायटी, जळगाव) याचे पार्वती नगर जवळ हॉटेल आहे. या संदर्भात मोहन वासुदेव बेंडाळे यांची पत्नी यांनी हॉटेल बारच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून हॉटेल मालक रवींद्र सुधाकर जगताप याने सोमवारी १७ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता मोहन बेंडाळे व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच धारदार वस्तूने मोहन बेंडाळे यांना जखमी केले. यासंदर्भात मंगळवारी १८ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजता संशयित आरोपी रवींद्र सुधाकर जगताप यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याबाबत पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.