भडगाव (प्रतिनिधी) – ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटाव्हेटरचा धक्का लागण्याच्या कारणावरून शहरातील खालची पेठ भागात शुक्रवारी दि. १४ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान लाठया काठ्या, लोखंडी रॉड, कोयत्यासह दगडफेक करीत दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. यात दोन्ही गटाचे साधारण ८ जण जखमी झाले आहेत. याबाबत भडगांव पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एका गटाच्या १३ संशयित आरोपींवर तर दुसऱ्या गटाच्या २३ संशयित आरोपींवर परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भिमराव गुलाब मालचे यांनी भडगांव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खालची पेठ येथील सार्वजनिक जागी संशयित आरोपीने संगनमत करून काही मंडळी जमवून यातील संशयित आरोपी याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या हाताचे मनगटावर मारले व फिर्यादीची पत्नी सकुबाई भिमराव मालचे व मुलगा दत्तात्रय मालचे, चुलत भाऊ प्रविण मालचे यांना देखील लाठी काठ्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीची पत्नी सकुबाई हिला दादा देवरे यांनी अर्वाच्य आणि अश्लील बोलून शिवीगाळ केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला असून फिर्यादी भिमराव गुलाब मालचे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला १३ संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख हे करीत आहे.
दुसऱ्या गटाकडून निलेश भरत पवार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खालची पेठ भडगांव येथील सार्वजनिक जागी यातील संशयित आरोपी यांनी साक्षीदार याचे ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटाव्हेटरचा धक्का दादाभाऊ आबा सोनवणे याच्या गाडीला लागला, याच्या कारणावरून साक्षीदार यास मारहाण केली होती. या कारणावरून संशयित आरोपी यांनी आमच्या नादी लागतात का ? तुमचा आज एकेकाचा काटा काढून तुम्हाला जिवंतच ठेवायचे नाही असे बोलत होते. त्यावेळी फिर्यादी व ईतर लोक त्यांना समजाविण्यास गेले असता आकाश संजय मोरे याने त्याचे हातातील लोखंडी रॉड मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच सदरचा रॉड त्याने फिर्यादीचे डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केल्ला. तसेच साक्षीदार विजय भरत पवार याच्या डोक्यावर भगवान युवराज गायकवाड याने लोखंडी रोड मारून दुखापत केली.
साक्षीदार विजय भरत पवार याच्या डोक्यावर भगवान युवराज गायकवाड याने लोखंडी रोड मारून दुखापत केली म्हणून, फिर्यादी निलेश भरत पवार याच्या फिर्यादीवरून भडगांव पोलिस स्टेशनला संशयित आरोपीविरुद्ध भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे. घटनास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.