जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
जळगाव (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाशी संबंधित असलेले डॉ.हेमकांत ऊर्फ हेमंत शिवाजीराव बाविस्कर हे देशातील तीन नेत्रतज्ज्ञ पैकी एक ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत. महाराष्ट्रासह जळगावसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. गत १७ फेब्रुवारी रोजी त्यांना विद्यापीठाने ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ म्हणून नियुक्त केले आहे.
याबाबत सोमवारी पत्रपरिषदेत आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ डॉ. बाविस्कर यांनी माहिती दिली. डोळ्यांचे आजारांसाठी ते स्वतः आणि केरळ येथील नारायण नंबूदिरीपाद हे संपूर्ण देशात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यताप्राप्त आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ आहेत. डॉ. बाविस्कर हे गेल्या २६ वर्षांपासून आयुर्वेदातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
डॉ. बाविस्कर म्हणाले की, भारत सरकारकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ ची निवड केली जाते. त्याअंतर्गत यावर्षीही निवडप्रक्रियेत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात डॉ. बाविस्कर यांनी केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ. गुप्ता व डॉ.हरिष सिंग यांनी जळगावात येऊन त्यांचे वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असेलेली सामाजिक जाणीव लक्षात घेऊन त्यांना नामनिर्देशित करुन आर. ए. व्ही.मार्फत त्यांची नियुक्ती केली.
राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाद्वारे नामांकित ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ अंतर्गत २ निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले जात असते. ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षणासोबतच, प्रॅक्टीस करुन त्यांचा प्रबंध ही पूर्ण करतात. ज्याचे सादरीकरण राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयुष मंत्रालयाकडून फेलोशिप प्रदान केली जाते, अशीही माहिती डॉ.हेमकांत बाविस्कर यांनी दिली.
आता उज्जैन व राजस्थान येथील विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत.