जळगाव (प्रतिनिधी) – ईडी, सीबीआय, सीआयडी यासह विविध न्यायसंस्थांचा भारतीय जनता पक्षाने गैरवापर सुरु केला आहे. देशातील खाजगी. सरकारी संस्थांवर दडपशाही, हुकूमशाही व्हायला नको. अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. न्यायालयात अनेक खटले प्रलंबित असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील खटल्याचा तातडीने कसा निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर लगेच, त्यांचे निलंबन होते हे देशात दडपशाही सुरु असल्याचे दिसून येते, असा घणाघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केला. काँग्रेस पक्षातर्फे रविवारी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवनासमोर सत्याग्रह आंदोलन झाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिन सोमवंशी यांच्यासह महिला, पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भाजपाविरोधात घोषणा देऊन सत्याग्रहाला प्रारंभ झाला. न्यायालयीन शिक्षा आणि लोकसभेतील सूडबुद्ध कारवाईला राहुल गांधी व त्यांचा परिवार तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अजिबात घाबरलेले नाही. उद्योजक अदानी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी यांच्यावर सुडाची कारवाई करण्यात आली, असे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सत्याग्रहाच्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. राज्यात आ. बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा झाली तरी त्यांचे निलंबन होत नाही. मात्र राहुल गांधी यांच्यावर आकस ठेऊन कारवाई केली जाते. भाजप दडपशाही करीत असल्याचेहि मालपुरे म्हणाले.