मुंबई (प्रतिनिधी) – पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील विविध कलम कमी करण्यासाठी प्र. पोलीस निरीक्षकाने तक्रारदारास लाच म्हणून १ लाख रुपये अथवा आयफोन घेऊन देण्याची मागणी केल्याचे धारावी येथे उघड झाले आहे. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रभारी पोलीस निरीक्षकास तडजोडीअंती ४० हजाराची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ अटक केली आहे.
२८ वर्षीय तक्रारदार व त्यांच्या आईविरुद्ध धारावी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांना १६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदार प्रभारी पोलीस निरीक्षक विजय शिवदास माने (वय ५३) यांना भेटले. माने यांनी तक्रारदार यास त्याच्यावर दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्याकरता एक लाख रुपये किंवा आयफोन मोबाइलची लाचेच्या स्वरूपात मागणी केली.
त्यानुसार तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने सापळा लावला. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता प्रभारी पोलीस निरीक्षक विजय शिवदास माने यांनी स्वतःच्या वैयक्तिक लाभाकरिता गुन्ह्यातील कलम कमी करून देतो, यासाठी तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी केली व सापळा कारवाईदरम्यान ती स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. त्यानुसार माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.