जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पाथरी येथील ११ वर्षीय मुलाच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून गावातील तीन डॉक्टरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील वाघळुद येथील दुर्वेश पाथरवट हा पाथरी येथे आईसोबत मामाच्या गावी राहत होता. १० ऑक्टोबर २०२१ रोजी दुर्वेशला ताप आल्याने कुटुंबियांनी त्यास पाथरी गावातीलच डॉक्टरांना वेळोवेळी दाखविले होते. त्यांनी त्यास गवेगळ्या दिवशी कमरेवर तब्बल चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन दिले. मात्र तरीही त्याची प्रकृती बरी झाली नाही. नंतर जळगावातील खाजगी दवाखान्यात त्याला नेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
जळगावात आणल्यावर त्याची विविध तपासणी सुरु असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता तेथे त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले होते. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यानुसार , दुर्वेश यास कमरेवरती इंजेक्शन दिले आणि या इंजेक्शनमुळे दुर्वेश यास गँगरीन होवून त्याचा मृत्यू झाला असे नमूद होते.
त्यानुसार गुरुवार, २३ मार्चला दुर्वेश याची आई प्रतिभा नाना पाथरवट यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार डॉ. स्वप्नील युवराज पाटील, युवराज गंगाराम उर्फ जयराम पाटील आणि डॉ. सुभाष जाधव यांच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मुलाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करत आहेत.