पहूर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्यानजीक ६० लाखांचा गुटखा घेवून जाणाऱ्या कंटेनरवर नाशिक येथील पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील यांच्या पथकाने सोमवारी २० मार्च रोजी पहाटे ५ वाजता पकडला. कंटेनरसह गुटखा हस्तगत करण्यात आला असून पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी.शेखर पाटील यांना मध्य प्रदेश मार्गाने महाराष्ट्रात गुटका येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पोलिस पथक पाठवून सोमवारी २० मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जामनेर रस्त्यावर सोनाळे फाट्यावर अशोक लेलँड कंटेनरसह ६० लाख रुपये किमती चा गुटखा पकडला.
अशोक लेलँड क्रमांक (एचआर ४७ डी ९८५६) या वाहनाचा चालक शराफत अली हसन महम्मद(वय – ३०) रा.चहलका तहसील तावडू, जिल्हा नुहु राज्य हरयाणा, वाहन मालक इम्रान खान शाहबुद्दीन घसेरा, रा. पलवल, राज्य हरयाणा, गोलु (मँनेजर) नाव गाव माहीत नाही, गुटखा मालक राजु भाटिया या चौघांनी संगनमत करून महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांनाही स्वतःच्याआर्थिक फायद्यासाठी दिलबाग प्लस पान मसाला, ए प्लस तंबाखू, सुंगधित तंबाखू व सुपारी दिल्ली राज्यातून महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे विक्रीसाठी जात असतांना पकडण्यात आला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







