लोकनेते गोपीनाथ मुंडे पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम
नाशिक (प्रतिनिधी) – “शेतकऱ्यांनो चिंता करू नका, अवकाळी पावसामुळे जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. एवढेच नाही तर, शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे आणि मुंडे साहेबांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, या राज्यात अनेक लोकनेते आपण पाहिले. ज्यांनी चांगले काम केले ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले, मात्र गोपीनाथ मुंडे हे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते. आजही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारी जनता आपल्या घरातील शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवतात. ही एक श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि हा एक विश्वास आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंडे साहेबांनी अनेक चढउतारही पाहिले. त्यांच्या जीवनात चांगले दिवसही आहे. पण काही संघर्षाचा काळही आला. ज्या ज्या वेळी संघर्षाचा आणि अडचणींचा काळ येत होता, त्या त्यावेळी बाळासाहेब, मुंडे साहेबांना मार्गदर्शनाचे दोन शब्द सांगत होते, असेहि शिंदे म्हणाले.